रेल्वे स्थानकांवर एकही प्रवासी नाही विनामास्क?

पश्चिम,मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकांवर मागील महिन्यापासून कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून, विनामास्क आढळणा-या लोकांवर महापालिकेसह क्लीन-अप मार्शल, मुंबई पेालिस आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई केली जात आहे. परंतु अंशत: लॉकडाऊन करण्यात आल्याने विनामास्कच्या कारवाईचे टार्गेट कमी झाले आहे. मुंबई पोलिसांनी आपले दीड हजारांपर्यंतचे टार्गेट कायम ठेवले असले, तरी मुंबई महापालिकेचे टार्गेट तीन ते साडेतीन हजारांवरुन केवळ १८००च्या घरात आले आहे. मागील महिन्यापासून रेल्वेवरील कारवाई पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात असल्याची बाब समोर येत आहे.

दररोज 20 ते 21 हजारांवर होत असे कारवाई

मुंबईत मागील जून महिन्यापासून विनामास्क विरोधातील कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर, जानेवारीपासून ही कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी तसेच क्लीन-अप मार्शलसोबतच मुंबई पोलिस आणि रेल्वे स्थानकांवरही कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी या तिन्हींच्या माध्यमातून दररोज २० ते २१ हजार नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली जात असे. परंतु अंशत: लॉकडाऊन करुन कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर, ही कारवाई आता ३ हजारांच्या आसपास होऊ लागली आहे.

(हेही वाचाः कडक लॉकडाऊन तरी सापडले साडेतीन हजार विनामास्क!)

रेल्वे स्थानकात कोणावरही कारवाई नाही

२३ मे रोजी एकूण ३ हजार २८२ विनामास्कच्या लोकांवर कारवाई करण्यात आली. तर त्याआधीच १९ मे रोजी ३ हजार ५८२ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे यातील मुंबई पोलिसांचे टार्गेट कायम असून, मुंबई महापालिकेच्या कारवाईचा आकडा कमी झालेला आहे. तर पश्चिम,मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकांवर मागील महिन्यापासून कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मास्क लावूनच प्रवास केला जात असल्याची बाब समोर येत आहे.

विनामास्कची कारवाई

१९ मे २०२१

महापालिकेची कारवाई: २१७३ नागरिक (दंडाची रक्कम ४ लाख ४३ हजार ६०० रुपये)

मुंबई पोलिसांची कारवाई : १४०९ नागरिक (दंडाची रक्कम २ लाख ८१ हजार ८०० रुपये)

रेल्वेची कारवाई : ००

२३ मे २०२१

महापालिकेची कारवाई : १८२८ नागरिक (दंडाची रक्कम ३ लाख ६५ हजार ६०० रुपये)

मुंबई पोलिसांची कारवाई : १४५४ नागरिक (दंडाची रक्कम २ लाख ९० हजार ८०० रुपये)

रेल्वेची कारवाई : ००

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here