मुंबईत अजूनही नागरिक रस्त्यावर थुंकतात! ७१ जणांवर कारवाई!

नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, मस्जिद आदी भागांमध्ये सर्वाधिक ५८ लोकांना रस्त्यांवर थुंकताना पकडण्यात आले.

80

कोविडच्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत सध्या ९९ टक्के नागरिक हे मास्क परिधान करत असले तरीही मुंबईच्या रस्त्यावर पचापच थुंकणारे आढळून येत आहेतच. मुंबईत गुरुवारी अशाप्रकारे रस्त्यांवर थुंकणाऱ्या ७१ जणांना पकडून त्यांच्याकडून १४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, मस्जिद आदी भागांमध्ये सर्वाधिक ५८ लोकांना थुंकताना पकडण्यात आले.

आतापर्यंत ३२ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल! 

मुंबईमध्ये रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली. मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत वेगवेगळ्या संस्थांच्या क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. मागील बुधवारपर्यंत म्हणजे ७ जुलै २०२१ पर्यंत अशाप्रकारे रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम चालवून १६ हजार ५८८ लोकांना दंड आकारण्यात आला. या कारवाईत थुंकणाऱ्यांकडून ३२ लाख ८७ हजार ७०० रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांच्या तोंडावर मास्क लावलेले असतानाही अशाप्रकारे पचापच थुंकून भिंती आणि रस्ते रंगीबेरंगी करताना रोगराई तसेच आजार पसरवण्याचे प्रकार होत आहे. मास्क लावल्यानंतरही अशाप्रकारे नागरिक थुंकताना आढळून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हेही  वाचा : ऑक्सिजन प्लांटसाठी आधी काढल्या निविदा, नंतर उभारले सीएसआर निधीतून!)

८ जुलै रोजी साडेचार हजार नागरिकांवर कारवाई

थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या क्लीन अप मार्शलवरच विना मास्कची कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत विनामास्क विरोधी मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी म्हणजे ८ जुलै २०२१ रोजी एकूण ४ हजार ८०८ मास्क न परिधान केलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांकडून ९ लाख ६१ हजार ६०० रुपये एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी १००२ नागरिकांवर कारवाई केली. तर उर्वरीत ३ हजार ८०६ नागरिकांवर महापालिकेच्यावतीने क्लीन अप मार्शलद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तर रेल्वे प्रशासनाच्यावतीने स्वतंत्रपणे विना मास्कची मोहिम राबवली जात  आहे.

रस्त्यांवर थुंकणाऱ्यांची संख्या

  • एकूण संख्या : ७१
  • ए विभाग :  ४६
  • बी विभाग :  १२
  • डी विभाग : ०६
  • मालाड पी उत्तर : ५
  • एम पूर्व : ०१

विना मास्क विरोधातील कारवाई

  • गुरुवारची एकूण कारवाई : ४८०८
  • महापालिकेने केलेली कारवाई : ३८०६
  • पोलिसांनी केलेली कारवाई : १००२
  • आजवरची एकूण कारवाई : २९ लाख ७१ हजार ६९५
  • वसूल केलेला आजवरचा एकूण दंड :  ५९ कोटी ८२ लाख ४२ हजार २०० रुपये

(हेही वाचा : मुंबईतील उद्यान, मैदानांची विकासकामे आता प्राधान्य क्रमानुसारच!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.