काळाचौकी येथील जिजामाता नगरमधील संक्रमण शिबिर येथे असलेल्या आपल्या मैदानावर मुंबई बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हाडा इमारत बांधणार आहे. त्यासाठी इथे असलेल्या मैदानावर प्राथमिक काम करण्यासाठी म्हाडाने विभागातील जनतेला कोणतीही पूर्वसुचना न देता जेसीबी पाठवला. आपल्या हक्काच्या मैदानावर कोणतेही खेळ आपण तिथे खेळू शकणार नाही, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम करू शकणार नाही, ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व मैदान वाचवण्यासाठी आज विभागीय जनतेकडून तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला. नागरिकांचा रोष पाहून जेसीबी माघारी फिरवण्यात आला. पूर्वी ह्याच जागेवर संक्रमण शिबिर होते. काही वर्षांपूर्वी म्हाडाने असुरक्षित ठरवून ते पाडले. ह्याच जिजामाता नगरच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर येथील शंभर पेक्षा जास्त कुटुंबं विभागाबाहेर फेकली गेली आहेत. त्यांना इथे संक्रमण शिबिर बांधून द्यावं, ही नागरिकांची मागणी आहे.
नागरिकांनी ऐक्याची ताकद दाखवून दिली
गेली ४० वर्ष ह्या जागेवर कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये, परिसरातील मुलांना खेळण्यासाठी, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी ह्या जागेचा वापर होत रहावा ह्यासाठी कित्येक वर्ष दक्ष असलेल्या नागरिकांनी एैक्याची ताकद काय असते हेच ह्या निमित्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले. विभागीय आमदार अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ताराम पोंगडे, भारतीय जनता पक्षाचे शिवडी विधानसभा उपाध्यक्ष महेश (भाऊ) पावसकर, भारतीय काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव गोरख कांगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी प्रतीक नांदगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवडी विधानसभा उपाध्यक्ष रवींद्र कदम, शिवसेना शाखा क्र. २०५चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्र. २०५चे अध्यक्ष राजेश मोरे, शिवसेना उपशाखाप्रमुख प्रवीण राणे, मनसे उपशाखाध्यक्ष किशोर भोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हाडा अधिकारी प्रशांत धात्रक (एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर), सचिन गुजराती (असिस्टंट इंजिनिअर) यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी म्हाडा कार्यालयात ह्या विषयावर लवकरच बैठक घेण्याचं मान्य केलं. हर्षद खोत, संदीप मेंगडे, अतुल कुरणकर, संदीप विचारे, राजेंद्र साळसकर, अरविंद चाळेकर, अनिकेत खोत, विवेक जाधव, संजय गुरव, सुशील साळसकर, अमेय फाटक, ओमकार गुरव, प्रीतम नरसाळे, प्रसाद अधिकारी, नीलेश रामाने, राजू बंदरकर, मुकुंद गावडे यांच्यासोबत सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्थानिक सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच मंडळांचे पदाधिकारी आणि खेळाडू मैदान बचाव मोहिमेत सक्रिय सहभागी झाले होते.
(हेही वाचा गड-किल्ल्यांवरील मुसलमानांच्या अतिक्रमणाविरोधात एकवटले दुर्गप्रेमी! काय करणार पुढे?)
Join Our WhatsApp Community