म्हाडाने 2800 सदनिका आणि 220 भुखंडाच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. याची सोडत प्रक्रिया 10 जून 2022 रोजी काढण्यात येणार आहे. अर्जदारांनी म्हाडाच्या वेबसाईटवर अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे. औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत 984 सदनिका व 220 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा आरंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते मंगळवारी 26 एप्रिल रोजी ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
औरंगाबाद मंडळाकडून आवाहन
सदनिकांच्या सोडतीच्या पुस्तिका तयार करण्यात आली असून, ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिक-त संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोडतीसाठीची नियमावली, मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन औरंगाबाद मंडळातर्फे करण्यात आले आहे.
( हेही वाचा: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ठाकरे सरकार जबाबदार! मोदींचा निशाणा )
या तारखेपर्यंत करु शकता अर्ज
26 एप्रिलपासून सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने अर्ज नोंदणी करावी. अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक 24 मे, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहील. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 25 मे, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत आहे.