१२वीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा २ आठवड्यांचा अल्टिमेटम! 

१२वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी देशात आणि परदेशात प्रवेश घ्यायचे असतात, त्यामुळे तातडीने निर्णय घ्या, असे न्यायालयाने म्हटले. 

आयसीएसई आणि सीबीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांनी १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा पण मग निकाल कसा लावणार आहात, त्याकरता काय निकष ठरवणार आहात, हे येत्या २ आठवड्यांत ठरवा आणि ते न्यायालयासमोर मांडा, यात कोणतीही सवलत घेऊ नका, असा अल्टिमेटम सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला.

ऑनलाईन मिटिंग घ्या, पण लगेच निकष ठरावा!

कोरोना महामारीत केंद्रीय शिक्षण मंडळ आणि अन्य राज्याच्या शिक्षण मंडळांच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी ऍड. ममता शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी, ३ जून रोजी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याआधीच बुधवारी, २ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षा रद्द कारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी न्यायालयाने १२वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी देशात आणि परदेशात प्रवेश घ्यायचे असतात, त्यामुळे तातडीने निर्णय घ्या, प्रसंगी ऑनलाईन दररोज मिटिंग घ्या, कारण राज्यातील शिक्षण मंडळेही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार भूमिका घेणार आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.

(हेही वाचा : मागील इयत्तांच्या निकालांवर १२वीचा निकाल?)

केंद्राकडून याचिका रद्द करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारकडून अ‌ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली. ममता शर्मा यांच्या याचिकेतील मागणी मंजूर झाली आहे, त्यांची याचिका रद्द करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, अशी विचारणा केंद्राला केली. त्यावर निकाल कसा जाहीर करणार हे सीबीएसई ठरवेल, असे केंद्राकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here