कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. पण, आता मात्र तुम्ही मास्क घातला नसाल, तर दंड आकारला जाणार नाही. त्यामुळे विनामास्क फिरणा-यांची आता दंडातून सूटका होणार आहे. या दंडात्मक कारवाईऐवजी आता प्रशासन लोकशिक्षणाचा मार्ग अवलंबणार आहे.
लोकशिक्षणावर भर
कोरोना काळात स्थायी समितीने दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन नियुक्त केलेल्या क्लिन अप मार्शलची सुट्टी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता त्यांच्याकडे स्वच्छताविषयक कामांची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता मास्कच्या बंधनातून मुक्त करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानेही थोडे नरमाईचे धोरण अवलंबून मास्कचे बंधन थेट शिथिल करण्याऐवजी या संदर्भात लोकशिक्षणावर भर देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
( हेही वाचा :बँकांची कामं पटापट उरका! कारण…तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद )
क्लिन अप मार्शलची आता अशी होणार नियुक्ती
- क्लिन अप मार्शलना सेवेतून कमी केल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियुक्त संस्थेला क्लिनअप मार्शल तैनात करावे लागणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत एका संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. काही संस्थांची एकापेक्षा अधिक विभाग कार्यालयांच्या हद्दीसाठी नियुक्ती करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
- विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी मुंबई अस्वच्छता करणारे, कचरा टाकणारे, थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थांच्या क्लिनअप मार्शलवर सोपविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.