Express Way : दर्जेदार आणि सुखद प्रवासाच्या अनुभवासाठी आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छता मोहीम

या मोहिमेसाठी नियोजित कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे. महामार्गाच्या ठिकाणी भूयारी मार्ग, सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आणि बाहेर पडण्याचे मार्ग आदी परिसरात राडारोडा असणाऱ्या जागांची पूर्वपाहणी करून हे परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत.

194
मुंबईतील नागरिक तसेच पर्यटक यांना द्रुतगती महामार्गाचा (Express Way) वापर करताना एक दर्जेदार आणि सुखद प्रवासाचा अनुभव यावा, यासाठी आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. सोमवारी १७ मार्च २०२५ ते शनिवारी २२ मार्च २०२५ या सहा दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान ही मोहीम पार पडणार आहे.
संपूर्ण मुंबईत लहानसहान रस्ते, गल्लीबोळ येथे सखोल स्वच्छता; त्यानंतर रस्ते दुभाजक, बॅरिकेड्स, विविध चौकांची स्वच्छता व सौंदर्यीकरण; शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालय परिसरात स्वच्छता असे विविध टप्पे पार केल्यानंतर आता मुंबईला जोडणारा महत्वाचा दुवा असलेल्या द्रुतगती महामार्गांवर (Express Way) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्वच्छ, सुंदर रहावा तसेच राडारोडा मुक्त असावा, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महामार्गावर सौंदर्यानुभवाच्या दृष्टीकोनातून नियमित सुशोभीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत.
या मोहिमेविषयी माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर (Express Way) तसेच त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सोमवारी १७ मार्च २०२५ पासून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार आहे. शनिवारी, २२ मार्च २०२५ पर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम दररोज रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतुकीला देखील अडसर होणार नाही आणि स्वच्छतेची कामे देखील जलद व चांगल्या रीतीने करता येतील. वाहतूक पोलिस विभागाच्या समन्वयाने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छता कालावधीत वाहतूक विभागाच्या मदतीने गरजेनुसार वाहतूक वळवणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मोहिमेसाठी संयंत्रे, उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या मोहिमेसाठी नियोजित कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे. महामार्गाच्या ठिकाणी भूयारी मार्ग, सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आणि बाहेर पडण्याचे मार्ग आदी परिसरात राडारोडा असणाऱ्या जागांची पूर्वपाहणी करून हे परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच धूळ निर्मूलनासाठी यांत्रिक झाडू संयंत्रे (मेकॅनिकल स्पीकिंग मशीन) वापरण्यात येणार आहेत. मोहिमेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची (Express Way) स्वच्छता जेटींग, प्रेशर वॉशर यासारख्या संयंत्राचा वापर करून करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीसाठीची सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरूस्ती केली जाईल.
द्रुतगती महामार्गालगतच्या (Express Way) कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्याला चुना आणि गेरूचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने रंगरंगोटी करणे, बस थांब्याच्या ठिकाणची आसन व्यवस्था, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, सार्वजनिक परिसरातील कचरा पेट्यांची स्वच्छता तसेच गरजेनुसार दुरुस्ती करणे, सार्वजनिक प्रसाधनगृह परिसरात नियमित स्वच्छता करणे, रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या जुन्या वाहनांचीही विल्हेवाट लावणे, इत्यादी नियोजन देखील या मोहिमेमध्ये केले आहे.
त्यासोबत, पदपथांचे पेव्हर ब्लॉक, दुभाजक विभागीय परिरक्षण खात्यामार्फत दुरूस्त करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, मोहिमेच्या काळात रस्त्यांना आणि पदपथ स्वच्छतेला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना हटवणे, अनधिकृत फलक, जाहिरात फलक (होर्डिंग) आदी निष्कासित करणे, या बाबींचा देखील मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या मोहिमेत विभागीय कार्यालयांनी (वॉर्ड) सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचना उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील नागरिक तसेच पर्यटक यांना द्रुतगती महामार्गाचा (Express Way) वापर करताना एक दर्जेदार आणि सुखद प्रवासाचा अनुभव यावा, हेच ध्येय ठेवून मोहिमेचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.