डीएनए चाचणीविना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा

राज्यातील रखडलेल्या शेकडो दत्तक विधानांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. डीएनए चाचणीविना राज्यातील शेकडो दत्तक विधान रखडले होते. मात्र या संदर्भामध्ये प्राधान्याने डीएनए चाचणी अहवाल देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी निर्देश दिले आहेत. या संदर्भातील एक बैठक बुधवारी दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली, यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गृहमंत्र्यांनी दिले आश्वासन

महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, राज्यातील अनेक बालकांचा नव्या कुटुंबांमध्ये प्रवेश रखडला होता. बालकांच्या डीएनए चाचणीविना त्यांच्या दत्तकविधानाचा मार्ग मोकळा होत नव्हता, यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे डीएनए चाचणी करुन घेणे अत्यावश्यक होते. यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करुन एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी न्यायवैद्यक चाचणी अहवाल प्राधान्याने करुन देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

(हेही वाचाः मुंबईकरांना दिलासा नाहीच, कॅबिनेट बैठक लोकल निर्णयाविनाच!)

लवकरच मिळणार हक्काचे घर

त्यासोबत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे आता राज्यात रखडलेल्या शेकडो दत्तक विधानांचा प्रश्न मार्गी लागणार असून, लवकरच या मुलांना हक्काचे घर मिळणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब असून याचा पाठपुरावा महिला आणि बाल विभागामार्फत करण्यात येईल, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.

(हेही वाचाः राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here