मुंबईमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक केले असून, मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण विनामास्क फिरणा-या बेजबाबदारांविरोधात सुरु असलेली कारवाई, मास्कबाबत महापालिका, राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून केले जाणारे आवाहन व जनजागृती यांमुळे दंडाच्या रक्कमेचे टार्गेट पूर्ण करताना क्लीन-अप मार्शलची मात्र दमछाक होत आहे. आपले दिवसभराचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मार्शल आता फेरीवाल्यांवर त्यांच्याकडून होणाऱ्या कचऱ्याचा दंड, मास्कच्या कारवाई अंतर्गत करत असल्याची बाब समोर आली आहे. नागरिकांना शिस्त लागावी म्हणून दंडात्मक कारवाई करत असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी यासाठी नेमलेल्या संस्था आपले दंडवसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार झाले आहेत. त्यामुळे मास्कविरोधी कारवाई संसर्ग रोखण्यासाठी आहे की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः कडक लॉकडाऊन तरी सापडले साडेतीन हजार विनामास्क!)
अशी केली जाते दंड‘वसुली’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता फेरीवालेही मास्क लावायला लागले आहेत. पण मास्क लावल्यानंतरही गिरगांव मध्ये काही फेरीवाल्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारला गेल्याची तक्रार फेरीवाल्यांनी स्थानिक भाजप नगरसेविका अनुराधा पोतदार यांच्याकडे केली होती. त्यामुळे या तक्रारीच्या अनुषंगाने संबधित क्लीन-अप मार्शलकडे विचारणा केल्यानंतर, त्यांनी दिवसाचं टार्गेट पूर्ण करण्याठी अशाप्रकारे कारवाई केल्याचे सांगितले. जो २०० रुपयांचा दंड आकारला, तो चक्क त्या फेरीवाल्याकडून नंतर कचरा होणार आहे, त्याची संभाव्य बाब म्हणून वसूल केला.
कायद्याचे पालन कोण करणार?
मुळात सध्या या क्लीन-अप मार्शलना विनामास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार आहे. कचरा टाकला म्हणून त्यांना दंड आकारता येत नाही. तरीही कचरा केला म्हणून नाही, तर कचरा केला जाईल म्हणून दंड आकारण्याचा प्रकार सुरू असल्याचे पेातदार यांनी सांगितले. त्यामुळे ही बाब गंभीर असून नागरिक जर लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मास्क लावत असतील आणि तरीही दंड होणार असेल, तर कायद्याचे पालन कोण करणार, असा सवाल पोतदार यांनी व्यक्त केला.
(हेही वाचाः सावधान! विनामास्क आढळल्यास आता ५०० रुपये दंड! )
क्लीन-अप मार्शलने केलेली कारवाई
०९ एप्रिल २०२१: ९ हजार ६७९ नागरिक, वसूल केलेला दंड: १९ लाख ३५ हजार ८००
११ एप्रिल २०२१: २ हजार ९७ नागरिक, वसूल केलेला दंड: ४ लाख १७ हजार ४००
क्लीन-अप मार्शल, पोलिस अणि रेल्वेने केलेली कारवाई
०९ एप्रिल २०२१: १२ हजार ९४४ नागरिक, वसूल केलेला दंड: २५लाख ८८हजार ८००
११ एप्रिल २०२१: ३ हजार ६७२ नागरिक, वसूल केलेला दंड: ७ लाख ३४ हजार ४००
आतापर्यंत केलेली कारवाई
विनामास्क प्रकरणी कारवाई: २५ लाख ४४ हजार ५५८
दंडाची एकूण रक्कम: ५१ कोटी २८लाख रुपये
Join Our WhatsApp Community