महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांत मॉल्स उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. तसेच, मार्चपर्यंत २५ लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, भविष्यात एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस बांद्रा-कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, तसेच राज्यभरातून महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
(हेही वाचा – Crime : वांद्रे येथे वृद्ध महिलेची हत्या, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ उपक्रम गेली २१ वर्षे सुरू असून, ‘उमेद’च्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. मात्र, उत्पादने चांगली असूनही विक्रीसाठी आव्हाने आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.
‘लखपती दीदी’ संकल्पनेतून महिलांना आर्थिक स्वावलंबन
महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना ‘लखपती दीदी’ म्हणतात. सध्या महाराष्ट्रात १८ लाख लखपती दीदी असून, मार्चपर्यंत हा आकडा २५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचा संकल्पही सरकारने केला आहे.
(हेही वाचा – Gold Rate in India : महानगरांमध्ये सोन्याचे दर ८५,००० रुपयांच्यावर, आणखी दरवाढीचा जाणकारांचा अंदाज)
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सांगितले की, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून जिल्हा व तालुका स्तरावर मॉल्स व विक्री केंद्रे उभारली जातील. राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही बचत गटांच्या उत्पादनांसाठी अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.
११ ते २३ फेब्रुवारीदरम्यान प्रदर्शन
‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५’ हे ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे. यामध्ये ५०० हून अधिक स्टॉल्स, ९० फूड स्टॉल्स आणि देशभरातील विविध कलाकृतींचा समावेश आहे. मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community