सेवा विवेक संस्थेचे संचालक किरण शेलार यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना सेवा विवेकच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांना सेवा विवेकचे माहितीपत्रक देण्यात आले. तसेच सेवा विवेकचे विविध उपक्रम मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले व त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक देखील केले.
आदिवासी महिलांना रोजगार देण्यासाठी कार्य
सेवा विवेक सामाजिक संस्था आदिवासी महिलांना सन्मान व रोजगार मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यात काम करत आहे. संस्थेतल्या बऱ्याच महिलांचे या संस्थेत काम करण्याआधी रोजगाराचे साधन शेतीकाम व घरकाम एवढेच होते. सेवा विवेक संस्थेसोबत जोडल्या गेल्यानंतर महिलांनी बांबू पासून बनणाऱ्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या कच्च्या मालाद्वारे उत्तम दर्जेदार वस्तू तयार करण्यात महिला तरबेज झाल्या आहेत.
रोजगारासोबतच महिलांना मिळतो सन्मान
त्यामुळेच त्यांनी बनवलेल्या वस्तूंना देशभरातून मागणी असतेच. संस्थेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना उत्तम प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच महिला आपल्या मुलांचे शिक्षण तसेच घरातील विविध जबाबदाऱ्या स्वीकारू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा त्यांच्या घरात तसेच त्यांच्या गावात सन्मान वाढू लागला आहे.
Join Our WhatsApp Community