CM Eknath Shinde : ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ आता महाराष्ट्रभर विस्तारणार

महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण स्वच्छता मोहीम अर्थात 'डीप क्लिनिंग ड्राइव्ह' सुरू करण्‍यात आली आहे. त्या-त्या परिमंडळातील सर्व मनुष्‍यबळ स्वच्छतेकामी एकाच वॉर्डात एकत्र आणून सर्व रस्ते झाडूने स्‍वच्‍छ करणे, ब्रशिंग करणे, उच्‍च दाबाने पाणी फवारणी करणे हे मुख्‍य उद्दिष्‍ट आहे.

272
CM Eknath Shinde : ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ आता महाराष्ट्रभर विस्तारणार

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) ही मुंबईकरांच्या उत्‍तम, निरोगी आरोग्‍यवर्धनासाठी उपयुक्‍त आहे. त्याचे दृश्य आणि दुरोगामी परिणाम आपल्याला नजीकच्या काळात अनुभवायला मिळतील. केवळ बृहन्‍मुंबई महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती ही स्‍वच्‍छतेची चळवळ मर्यादीत नाही. मुंबईतील संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेकडे माझे व्यक्तिश: लक्ष असून स्‍वच्‍छ, सुंदर, निरोगी, आरोग्‍यदायी आणि प्रदूषणमुक्‍त मुंबईसाठी राज्‍य शासन वचनबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर विस्तारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. मुंबईतील अवैध वाहतूक पार्किंगची समस्‍या सोडविण्‍यासाठी लवकरच मार्शलची नेमणूक करण्‍यात येणार असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी नमूद केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यास दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रारंभ केला आहे. या मोहीम अंतर्गत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची पाहणी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवार (दिनांक १७ डिसेंबर २०२३) सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी भेट देवून केली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

(हेही वाचा – MNS Drug Free Pune Camp : ड्रग्ज मुक्त पुण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनजागृती अभियान)

मुख्यमंत्री शिंदेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या तीन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक प्रशासकीय विभाग याप्रमाणे तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. परिमंडळ ६ मध्‍ये एन विभाग, परिमंडळ ५ मध्‍ये एम पश्चिम विभाग आणि परिमंडळ २ मध्‍ये एफ उत्‍तर विभागात मोहिमेत सहभाग नोंदवतानाच स्वच्छतेच्या कामांची पाहणी शिंदे यांनी केली.

घाटकोपर (पश्चिम) मधील अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याला मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी पुष्‍पहार अर्पण करून दौ-याचा प्रारंभ करण्‍यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यानी अमृतनगरमधील स्वच्छतेची पाहणी करतानाच जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन रस्ता स्वच्छ केला. त्यानंतर तेथे त्यांनी जनसमुदायाला संबोधित केले. एन विभागामध्येच कामराज नगरात देखील भेट देवून मुख्यमंत्री महोदयांनी रस्‍ते स्‍वच्‍छता केली. याप्रसंगी स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

(हेही वाचा – Sachin Tendulkar चा मुंबई इंडियन्सला राम राम? चर्चेला उधाण)

मुख्यमंत्री शिंदेनी केले ‘त्या’ विद्यार्थ्यांचे कौतुक

घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी भागात सेठ वाडिलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्‍होरा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालयास मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली. रूग्‍णालयाच्‍या आवारात स्वच्छता केल्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या विस्‍तारित इमारत बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला. रूग्‍णालय आवारात जमलेल्‍या विद्यार्थ्यांशी त्‍यांनी हस्तांदोलन केले. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी झळकावलेले संदेश पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

…आणि एकनाथ शिंदेनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला

पुढे एम पश्चिम विभागात चेंबूर (पूर्व) येथे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मुख्‍यमंत्री (CM Eknath Shinde) महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच, स्वतः पाईप हाती घेत जेट स्प्रेच्या सहाय्याने उदयानासमोरील रस्ता पाण्याने धुतला. त्यानंतर चेंबूर (पश्चिम) मधील टिळक नगरात जावून तेथे सह्याद्री मैदानाभोवतालचा पदपथ जेट स्प्रेच्या सहाय्याने पाण्याने धुवून धूळमुक्त करण्यात आला. मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थितांना स्‍वच्‍छतेचे महत्‍त्‍व विषद करत असताना तरूणांच्‍या आग्रहास्‍तव मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) त्यांच्यासमवेत काही क्षण क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. मैदान परिसरात कार्यरत स्वच्छता कर्मचा-यांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मनोबल वाढवले.

(हेही वाचा – Sarathi : ‘सारथी’च्या चौकशी अहवालात दडलंय काय?)

मानवी परिश्रमाला शक्य तितकी तांत्रिकी पद्धतीची जोड देण्‍याचा आमचा प्रयत्‍न – मुख्यमंत्री

नागरिकांना संबोधित करताना तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्‍यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्‍हणाले की, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण स्वच्छता मोहीम अर्थात ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’ सुरू करण्‍यात आली आहे. त्या-त्या परिमंडळातील सर्व मनुष्‍यबळ स्वच्छतेकामी एकाच वॉर्डात एकत्र आणून सर्व रस्ते झाडूने स्‍वच्‍छ करणे, ब्रशिंग करणे, उच्‍च दाबाने पाणी फवारणी करणे हे मुख्‍य उद्दिष्‍ट आहे. रस्ते स्‍वच्‍छतेकामी महानगरपालिका अशा प्रकारची संकल्पना पहिल्‍यांदाच राबवित आहे. केवळ रस्‍तेच नव्‍हे तर पदपथ, रस्‍त्‍यांलगतची गटारे, गल्‍ली बोळातील रस्ते, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे हे सगळे एकाच वेळी स्‍वच्‍छ केले जात आहे. परिमंडळातील सुमारे दोन ते अडीच हजार मनुष्‍यबळ एका वॉर्डात एकत्रित येऊन काम केल्‍याचा मोठा फरक आपणास पाहावयास मिळत आहे. महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी या मोहिमेसाठी सक्रिय झाले आहेत. कर्मचारी देखील अधिक व चांगल्या क्षमतेने काम करीत आहेत. मानवी परिश्रमाला शक्य तितकी तांत्रिकी पद्धतीची जोड देण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे, जेणेकरून स्‍वच्‍छतेचे काम अधिक प्रभावी होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.