मुंबई शहर भागात नागपाडा येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाई य.ल. नायर रूग्णालयाच्या माध्यमातून, विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई.आय.आर.सी.सी.) च्या धर्तीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पूर्ण क्षमतेने अशा स्वरुपाची केंद्रं सुरू करावीत, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. खाजगी रूग्णालयापेक्षाही अधिक दर्जेदार असे हे केंद्र उभारल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कौतुकास पात्र आहे. यासारखी केंद्रं ठाणे आणि राज्याच्या इतर शहरांमध्येही तयार व्हायला हवी, असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाई य.ल. नायर धर्मादाय रूग्णालयाच्या माध्यमातून ‘विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र’ साकारण्यात आले आहे. पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसेच कुमारी बुशरा रईस शेख यांच्या संयुक्त हस्ते २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी झाले, याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार यामिनी यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव व बाई य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी संबोधित करताना म्हणाले की, अतिशय चांगल्या संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभारण्यात आले आहे. उत्तम व प्रशिक्षित असा वैद्यकीय चमू यासाठी कार्यरत आहे. विशेष मुलांसाठी एकाच छत्राखाली केंद्र असणे, ही काळाची आणि समाजाची गरज आहे. अशा प्रकारची केंद्र आपण उभी करतो, तेव्हा एक वेगळं समाधान मनाला मिळते. विशेष मुलांच्या गरजा या विशेष प्रकारच्याच असतात. विशेष मुलांसाठीच्या अनेक वैद्यकीय उपचाराच्या गरजा या आर्थिकदृष्ट्या पालकांना न परवडणाऱ्या असतात. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने साकारलेल्या या केंद्रातून विशेष मुलांवर विनामूल्य उपचार करण्यात येतील, त्यामुळे पालकांना दिलासा मिळेल आणि संबंधित रुग्णांची सोय होईल, त्याचे समाधान मोठे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. विशेष मुलांना स्वच्छतेची गरज सर्वाधिक असते. म्हणून नियमितपणे परिसरात आणि एकूणच शहरात स्वच्छता व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यावर उपचार करणे ही कठीण आणि आव्हानात्मक बाब आहे. त्यासाठी अतिशय जिद्द आणि अथक प्रयत्न करावे लागतात. अशा विशेष मुलांसाठी अवितरपणे कामकाज करणे ही अतिशय मोलाची बाब आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या केंद्राचा आदर्श घेवून अशा स्वरूपातील केंद्रं मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगर, ठाणे यासह राज्यातील इतर शहरांमध्येही उभारण्याची गरज आहे, असे मत देखील मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यावेळी मांडले.
Join Our WhatsApp Community