मागील बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसात मुंबईत कुठेही पाणी तुंबण्याचा प्रकार न घडल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले होते. परंतु दोनच दिवसांत मुख्यमंत्र्यांना मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले.
शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसांमध्ये शीव, कुर्ला, चेंबूर, अंधेरी सब वे, मानखुर्द आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे नालेसफाईचे काम चांगल्याप्रकारे झाल्याचा दावा प्रशासनाच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात दोनच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना आपले हे कौतुक मागे घेण्याची वेळ आली आहे.
मागील बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत ४४ मि. मी ते ११५ मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. मुंबईत त्यादिवशी जास्त प्रमाणात पाऊस पडला नसला तरी कल्याण अंबरनाथ येथे तुंबलेल्या पाण्यामुळे रेल्वे लोकल सेवेवर परिणाम होऊन मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाली होते.
त्यानंतर या घटनेचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत मुसळधार पाऊस पडूनही पाणी तुंबण्याचा प्रकार न घडल्याने प्रशासनाचे कौतुकही केले होते.
मात्र, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात सरासरी ७३. ६२ मि. मी, पूर्व उपनगरांत ८८.३० मि. मी आणि पश्चिम उपनगरांत ६३.२९ मि. मी एवढ्या सरासरी पावसाची नोंद झाली. यामध्ये शहरांत दादर, परळ, शीव, वडाळा आदी भागांमध्ये सरासरी ८० ते १०४ मि. मी एवढया पावसाची नोंद झाली होती, तर पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द आदी भागांमध्ये सरासरी १०० मि. मी पेक्षा अधिक पाऊस पडला होता.
(हेही वाचा – मुंबईतील झोपडपट्टीधारकांचा मोठा तिढा सुटण्याची शक्यता; अतुल सावेंची माहिती)
तर पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी मरोळ परिसरात सर्वांधिक १२७ मि. मी एवढा पाऊस तर वांद्रे परिसरात ११२ मि. मी आणि अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आदी भागांमध्ये जवळपास १०० मि. मीच्या आसपास आणि विलेपार्ले, सांताक्रुझ भागांमध्ये सरासरी ८० ते ९० मि. मी एवढा पाऊस दुपारी तीन वाजेपर्यंत पडला होता. जर या मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वे हे पाण्याखाली गेले होते, तर दादर हिंदमाता, शीव, कुर्ला, मानखुर्द, कुर्ला आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले.
त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले तसेच इतर अधिकारी यांच्यासह हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केट आणि मिलन सब वेसह अंधेरी सब वेमधील पावसाच्या पाण्याच्या निचरासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान, आयुक्त पाहणीला येण्यापूर्वीच पाण्याचा निचरा झाल्याने ते जनतेच्या मुखातून कौतुक ऐकण्यासाठी आयुक्त घटनास्थळी गेले होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community