CM Majhi Ladki Bahin Yojana : शुल्क वसूल करणाऱ्यांविरोधात महापालिकेची पोलिसांत तक्रार

776
CM Majhi Ladki Bahin Yojana : शुल्क वसूल करणाऱ्यांविरोधात महापालिकेची पोलिसांत तक्रार

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शुल्क आकारणाऱ्याविरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महानगरपालिकेच्या एम/पूर्व विभागात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकाकडे शुल्काची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतही ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (CM Majhi Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – Breakdown Accident : विक्रोळीत ब्रेकडाऊनमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; पावसाळ्यात वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?)

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. परंतु, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र महिलांकडून प्रती अर्ज १०० रुपये शुल्क खासगी व्यक्ती घेत असल्याची माहिती सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे यांना प्राप्त झाली. याबाबत त्यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना अवगत केले असता डॉ. शिंदे यांनी या प्रकरणी तत्काळ पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार, नागरिकांची दिशाभूल करुन पैसे उकळत असल्याप्रकरणी देवनार पोलिस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात १५ जुलै २०२४ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केलेली आहे. महानगरपालिकेच्यावतीने मुंबईमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी २१ ते ६५ या वयोगटातील महिला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. मुंबईत अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.