मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत 3600 रुग्णांना एकूण 28 कोटी 32 लाख रुपयांची मदत दिली आहे.
( हेही वाचा : लिंगाडे नशीबाचे धनी; अमरावतीच्या जागेवर पराभूत का झालो याचं आत्मचिंतन करणार – चंद्रशेखर बानवकुळे)
यामार्फत जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश
जानेवारी महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे. राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो, असे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community