राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी. या विभागाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला गंभीर आजारासाठी वैद्यकीय मदत निधी दिली जाते. परंतु दुर्दैवाने हा विभाग माविआ सरकारच्या काळात बंद झाला होता. हा विभाग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरु केला आहे. या विभागाची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करून देण्यात आली आहे.

ज्यांनी विभागाची संकल्पना मांडली ते चिवटे बनले विभागप्रमुख
मागील अडीच वर्षांपासून हा कक्षा बंद होता. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात हा कक्षा सुरु करण्यात आला होता. विशेष म्हणजे मंगेश चिवटे यांनीच फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना मांडली होती. राज्यातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या हेतूने सरकारच्या माध्यमातून हा कक्ष उभा राहिला होता. पत्रकारितेसोबतच आरोग्य दूत म्हणून मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेत काम सुरू केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून मंगेश चिवटे यांनी जबाबदारी सांभाळली. अथक प्रयत्नानंतर मंगेश चिवटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून या कक्षाची उभारणी केली. या कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकार काळात ५०० कोटींहून अधिक गरजू रुग्णांसाठी खर्च करण्यात आले. ५० हजाराहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला होता. कोरोना काळातील दोन वर्षांच्या काळात कोरोनाच्या दोन लाटांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देण्यापासून ऑक्सिजन बेड, रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, यासाठी मंगेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमांतून विशेष प्रयत्न केले होते.
(हेही वाचा आता पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’?)