तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ९ मे रोजी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी, मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनावरील वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन केले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या सभेमध्ये मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला.

“माझा डॉक्टर” म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली. तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे, कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास, रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे, मुख्यमंत्री म्हणाले.

होम कॉरंटाईन रुग्णांकडे लक्ष हवे

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करुन दिले जातात, यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तात्काळ उपचार सुरू केल्यास, वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळत आहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे, तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीसाठी का होते गर्दी? ही आहेत उत्तरे)

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे, हे लक्षात घेऊन खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे. राज्यात १२७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो. मात्र कोविडमुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ काळासाठीचा आराखडा तयार केला असून, त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

लहान मुलांकडे लक्ष ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन, राज्यात बालरोग तज्ज्ञांची एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांना होणारे सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here