महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, तरुणांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांना सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स(आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे. आपण मायभूमीपासून दूर गेलात, पण तुमची पाळेमुळं इथंच आहेत. मनाने तुम्ही इथेच आहात, याचा आनंद आहे. जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येतो आहे, हे आशा पल्लवीत करणारे आहे. मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे. आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्यादृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः देश कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करुया… मुख्यमंत्र्यांचे आवाहन)

नव्या संकल्पनांचे स्वागत

महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणामध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत आहोत. मुंबई मनपा शाळांच्या गुणवत्ता वाढीमुळे आता प्रवेशासाठी रांग लागू लागली आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचेही स्वागत केले जाईल.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपला शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आपल्या आयुष्याची गुंतवणूकच शेतीत करतो. पण तो पावसाच्या अनियमिततेमुळे हताश होतो. त्याला कधी दुष्काळाचा, तर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो. मेहनती शेतकऱ्याला या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मालाला हमी नव्हे तर हमखास भाव मिळेल. त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल. उद्योग जसा आखीव-रेखीव असतो, तसेच त्याला संघटित करण्याचा प्रयत्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचं पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे. अशा कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, औषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचना, नवे प्रकल्प, संकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

(हेही वाचाः राष्ट्रवादीच्या भरणेंवर शिवसैनिक खवळले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here