देश कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करुया… मुख्यमंत्र्यांचे आवाहन

72

कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

आपली जबाबदारी

केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नियमांचे पालन करा

कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षापासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. पण कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही, परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये, म्हणून आपण सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला. आता साथ आटोक्यात आली असली, तरी आपल्याला अजूनही संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधांत शिथिलता आणत आहोत. पण तरीही आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ऑक्सिजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली, तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे यापुढेही कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आपल्याला स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोक चळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. यानिमित्ताने मी माझा देश, राज्य कोरोनापासून मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.