कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध… काय म्हणाले मुख्यमंत्री?

कोणत्याही राज्याने केल्या नसतील अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कोणाच्याही विरोधात नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करुन उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, असे आवाहनही केले आहे.

आरोग्य सुविधा अपु-या पडण्याची वेळ

राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्दैवी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका सरकारची नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कोणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावा अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेड्सची संख्या सात-आठ हजार होती. ही संख्या आता पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केल्या नसतील अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार!

लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे

लसीकरण सुरु झाले आहे. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपण लसीकरणाची गती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरुन आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरुण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामासाठी घराबाहेर पडत आहे. लक्षणं नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

व्यापा-यांना आवाहन

मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे, संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसरा हल्लाही आपल्यावरच झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणे मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापूर्वीच खाजगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. खरेतर दुकाने चोवीस तास उघडी ठेवा, असे आवाहनही केले होते जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही, तर गर्दी टाळणे हा आहे. तसेच कामगारांच्या कोविड चाचण्या करण्यात याव्यात, असेही त्यांनी व्यापारांना सांगितले.

(हेही वाचाः सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांना विशेष पोलिस अधिकाऱ्याचे तात्पुरते अधिकार! भाजपचा मात्र विरोध)

राज्यात भीषण परिस्थिती

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास म्हणाले, फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार, एप्रिल अखेरीस बारा लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते. टास्क फोर्सचे डॉ. जोशी म्हणाले, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरुण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here