तिसरी लाट थोपवायची की तिला आमंत्रण द्यायचे… काय म्हणाले मुख्यमंत्री?

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

111

आता सणावाराचे दिवस आहेत, गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना वाढला. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढताना दिसत आहे, त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच, ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे, हे सांगतानाच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट

महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या राज्याने केली असावी. पण आजही आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. आपण रोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरुन आणावी लागत आहे. त्यात काही वेळ जाणार आहे, असे सांगून आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे. सव्वा लाख ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

(हेही वाचाः तिस-या लाटेला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन)

ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज

गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्वाचे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली. आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. राज्याची ऑक्सिजनचे उत्पादन करण्याची क्षमता दररोज १२०० ते १३०० मे.टन असून, ही गरज मागच्यावेळी १७०० ते १८०० मे.टन एवढी वाढली होती. इतर राज्यांतून हजारो कि.मी. वरुन ऑक्सिजन आणावा लागला, त्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यांतून ऑक्सिजन मिळत नाही. तो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे.

(हेही वाचाः राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले)

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळा सुरू आहे. डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कोविड नसला तरी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. लसीचे दोन्ही डोस घ्या, पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरताना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गाव कोरोनामुक्त करा

कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबवली. मला खूप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जशी महत्वाची गोष्ट आहे तशीच ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

(हेही वाचाः पडळकर सहा वेळा का म्हणाले ‘किंबहुना’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.