तिस-या लाटेला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

तिसरी लाट अपरिहार्य असेल, तर ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली आहे. असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असताना ही चर्चा कशासाठी?, तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटू आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, तर ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या एक पाऊल पुढे टाकले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, ही परिषद त्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः कशी येणार मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? वाचा…)

तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्याची गरज

तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत तर डॉक्टर, नर्सेस, पोलिस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपण ही सज्ज राहण्याची आवश्यकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

रुग्णालयांनी ऑडिट करुन घेण्याचे आवाहन

आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करुन घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

(हेही वाचाः ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते इतिहास पुसतात, रोखठोकमधून राऊतांची केंद्रावर टीका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here