वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची समज! मंत्रिमंडळात लसीकरणाच्या श्रेयवादाचा मुद्दा गाजला?

वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा, अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले होते.

147

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला. मात्र या मंत्रिमंडळ बैठकीत गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणावरून रस्सीखेच सुरू होती. या सर्व प्रकाराची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, यापुढे मंत्रिमंडळात मंजूरी मिळण्याअगोदर कोणत्याही निर्णयाची माहिती माध्यमांसमोर देऊ नका, असा सज्जड दम ठाकरे सरकारमधील सर्वच मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बुधवारी कॅबिनेटची बैठक सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याअगोदर माध्यमांना माहिती कशी दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत यापुढे असे होऊ देऊ नका, असे सर्वच मंत्र्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

म्हणून आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती!


दोन दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीवरून ठाकरे सरकारमधील काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ज्यावेळी राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला, तेव्हा संबंधित विभागाचे मंत्री राजेश टोपे यांना ही माहिती माध्यमांना सांगावी, असे सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून देखील लगेच प्रेस नोट काढण्यात आली. एरव्ही कॅबिनेट बैठक झाल्यानंतर तीन पक्षाचे मंत्री वेळवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले होते. मात्र काल निर्णय झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा राजकीय श्रेयवाद नको म्हणून माध्यमांना सविस्तर माहिती दिली.

(हेही वाचा : सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा! अतुल भातखळकरांची एनआयएकडे मागणी)

याआधीही मुख्यमंत्र्यांनी दिलेली समज

ठाकरे सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांना समज देण्याची मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा, अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले होते. विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत, अशी वक्तव्य करू नका अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या.

काय होते नेमके प्रकरण?

मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मागच्या कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. तसेच नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचे कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले होते. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून निशाणा साधला होता. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला होता.

काँग्रेसने व्यक्त केली होती नाराजी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावरून नाराजी व्यक्त केली होती. मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून, आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असे थोरात म्हणाले होते. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असेही थोरात म्हणाले होते. तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी
राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. थोडसे वेगळे वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत क्रेडिट घेण्याचे राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, अभी ज़रा बाज़ आएँ। असे ट्विट निरुपम यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.