आता शिकाऊ लायसन्ससाठी आरटीओ ऑफिसात जाण्याची गरज नाही

अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना, तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

110

शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करुन देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देणे शक्य आहे, त्या उपलब्ध करुन देण्यासाठी ई- गर्व्हनंन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. “सारथी ४.०” या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना, तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

खर्चात बचत, कामाचा ताणही कमी

राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसेच २० लाखांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे  १०० कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याने, खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहेत. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे २०० अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने, विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणेही यातून शक्य होईल.

(हेही वाचाः ‘दगडूशेठ’ गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य!)

सुरक्षित परिवहन सेवेला प्राधान्य

महाराष्ट्र विकासात अग्रेसर असलेले राज्य आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम सेवा महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जावा, तसेच सुरक्षित प्रवासाबरोबर सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरुपात देऊन त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम कसे वाचवता येतील, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जावेत. वेगवान आणि पारदर्शी सेवा उपलब्ध करून देताना विभागाने सुरक्षित परिवहन सेवेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

परिवहन सेवेतील हे क्रांतिकारी पाऊल- अनिल परब

जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचे लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात  गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरू ठेवण्यासाठीही ऑनलाईन सुविधा अत्यंत महत्वाची आहे. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या ८५ सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली.

(हेही वाचाः पर्यटकांची लोणावळा-खंडाळामध्ये गर्दी : कोरोना निर्बंधांचे उल्लंघन)

अशी होईल नोंदणी

शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती. आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून, यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तात्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई-स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील. त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.