‘स्वराज्यभूमी’ प्रेक्षक गॅलरीचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

157

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’लगत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन गेल्यावर्षी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन आज याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर संजीव कुमार, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

(हेही वाचा राऊतांना कामधंदा नाही, त्यांच्यावर काय बोलायचे? फडणवीसांनी केले दुर्लक्ष)

याबाबत अतिरिक्त माहिती पुढीलप्रमाणे आहे 

• स्वराज्यभूमी गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन जलवाहिनीच्या पातमुखावरती सुमारे ४८३ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम दि. ३ सप्टेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आले होते.

• या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे आणि ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे.

• भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात आली आहे.

• ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधीत परवानग्या काम सुरु करण्यायापूर्वीच प्राप्त झाल्या असून साधारणपणे ८ महिन्यांच्या कालावधीत ही गॅलरी आकारास आली आहे.

• ‘दर्शक गॅलरी’ अर्थात सदर ‘व्ह्युईंग डेक’वर एकाच वेळेस किमान ५०० पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे. तसेच ‘नेताजी सुभाष मार्ग’ अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणा-या ‘मरिन ड्राईव्ह’चे विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे.

• या प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधित परवानग्या प्राप्त करुन घेतल्या असून प्रकल्पाचा मूळ कालावधी १२ महिन्यांचा असून सुद्धा सदर प्रकल्प ८ महिन्यातच पूर्ण करण्यात आला आहे.

• ठिकाणी विश्रांतीसाठी कल्पकतेने आसने मांडण्यात आली असून या ठिकाणी फुल झाडांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

• ‘व्ह्युविंग डेक’च्या परिरक्षणाचे काम हे महानगरपालिकेतर्फेच करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.