बालमोहनच्या शिक्षिका रणदिवेंची मदतीची हाक! विद्यार्थी राज-उद्धव ठाकरे धावले मदतीला! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे वसईतील वृद्धाश्रमात राहतात. त्याचे तौक्ते वादळात नुकसान झाले म्हणून रणदिवे बाईंनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती.

138

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शिकवणाऱ्या बालमोहन शाळेतील शिक्षिका सुमन रणदिवे वसईतील वृद्धाश्रमात राहतात. तौक्ते वादळात या आश्रमाचे छप्पर उडाले, तसेच अन्यही नुकसान झाले. त्यावर रणदिवे बाईंनी त्यांचे विद्यार्थी राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने शिक्षिकेला संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल, असे सांगितले. तर मनसेच्या वतीने तातडीने मदत पुरवण्यात आली. सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.

मुख्यमंत्र्यांकडे केली याचना!

उद्धव मी तुला शिकवलंय, चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचे खूप नुकसान झाले. छप्पर उडाले. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर, असे रणदिवे बाई म्हणाल्या. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने रणदिवे बाईंना संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल, अशी हमी दिली.

(हेही वाचा : वीर सावरकरांच्या जयंतीदिनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्कारांचे आयोजन)

मनसेने पुरवली तातडीने मदत! 

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही रणदिवे बाईंशी संपर्क साधण्यात आला. स्वतः मनसे नेते अखिल चित्रे यांनी या वृद्धाश्रमाला भेट दिली. तसेच रणदिवे बाईंशी चर्चा केली. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत रणदिवे बाई फोनवरून बोलल्या. त्यानंतर ४० चटई, २५ पत्रे आणि 5 बारा लिटरचे ऑक्सिजन कॉम्प्रेसर या आश्रमाला मनसेने दिले.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या सध्या 90 वर्षांच्या आहेत. रणदिवे बाई सध्या वसई येथील वृद्धाश्रमात आहेत. या ठिकाणी २४ वृद्ध राहतात. कोकणासह मुंबई उपनगराला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. वसईतील या वृद्धाश्रमाला या वादळाचा फटका बसला. या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी रणदिवे बाईंनी त्यांचे विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे मदत मागितली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.