पुराच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

150

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून, कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. परंतु महाराष्ट्रातील आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

असे द्या योगदान

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. म्हणूनच वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

(हेही वाचाः राज्य चालवायला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत! राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला)

मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्तांना आश्वासन

रविवारी मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तुमचे जे नुकसान झाले आहे, त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिली आहे. पाणी अचानक कसे भरले, पूर का आला?, याचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. पूर तुम्हाला काही नवीन नाही, हे मला कुणीतरी सांगितले. यंदा पूर मोठ्या प्रमाणावर आला, कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचे जलव्यवस्थापन करावे लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये, असं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा पायगुण! राणेंची बोचरी टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.