डोंगर उतारावरील लोकांचे स्थलांतर करावे, महाड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता

डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

148

महाड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातही भाष्य केले.

(हेही वाचाः कोकणावर जल आपत्ती! आता महाडमध्ये दरड कोसळली! ३६ जणांचा मृत्यू)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गेल्या चार-पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहे. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे. मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य)

ढगफुटीचा अंदाज नाही

तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. मात्र, आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 30 ते 36 लोक मृत्यूमुखी पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पूरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनाही त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या सगळ्यातून मार्ग काढत पथके त्याठिकाणी पोहोचत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

(हेही वाचाः आता चिपळूण, महाडमध्ये बचाव कार्याला वेग! पावसाचा अलर्ट मात्र कायम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.