रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन, सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करत आहेत, अशी माहिती दिली.

(हेही वाचाः राज्यात पावसाचा कहर! कोल्हापुरात पंचगंगेला पूर, २०१९च्या महापुराच्या आठवणीने चिंता)

रत्नागिरीतल्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

यावेळी बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीच्या धोक्याची पातळी ७ मीटर असून, सध्या ती ९ मीटर वरुन वाहत आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून, ती ७.८ मीटर वरुन, तर काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरुन वाहत असून कोंदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरुन वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर ही शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरू केले आहे.

रायगड, रत्नागिरीतही पावसाचा कहर

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी  धोका पातळी वरुन वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.

(हेही वाचाः मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कोसळली दरड! रेल्वे वाहतूक ठप्प)

धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून, हे धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून, ते देखील ६३ टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला, त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here