डिझेल आणि पेट्रोलच्या दरांत सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या महागाईचा फटका बसत आहे. आता यात आणखी भर पडली आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून घरगुची गॅस ( PNG) आणि सीएनजीच्या दरांत मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस साडे चार तर सीएनजी 5 रुपयांनी महागले आहे.
आठवड्याभरात दुस-यांदा वाढ
6 एप्रिलला सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ करण्यात आली होती. आता याला आठवडा उलटत नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता. पण त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलला राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
( हेही वाचा: ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम )
म्हणून सीएनजी- पीएनजी दरांत वाढ
तसेच रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिमाण होत असल्याने नैसर्गिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे. सीएनजीच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून आयात केल्या जाणाऱ्या नैसर्गिक गॅससह देशांतर्गत गॅसचाही उपयोग केला जातो. या गॅसचा दर वर्षात १ एप्रिल आणि १ ऑक्टोबर या दोन दिवशी निश्चित केला जातो. यंदा हा दर निश्चित करतानाच तो वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ११० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ झाली आहे.