कोकण काय आहे हे आपण जगाला अजून नीटसे सांगितले नाही. कोकणाचे महत्व, त्याचे मूल्य जगाला सांगितले पाहिजे. कारण आपण परदेशात जाऊन जे पाहतो ते सगळे आपल्या कोकणात आहे, असे नंतर स्वतःलाच सांगतो. मग कशाला मालदीव आणि केरळला जायचे? कोकणाचे किल्ले, समुद्र किनारे आणि मंदिरे हे कोकणाचे वैभव आता जगासमोर आणले पाहिजे, आपल्या संपर्कातील लोकांना हट्टाने कोकण पाहायला येण्याचा आग्रह धरला पाहिजे, तरच कोकणातील पर्यटनाचा चा खऱ्या अर्थाने विकास होईल, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
कोकणाची संपूर्ण माहिती देणाऱ्या ‘कोस्टल कोकण’ नावाच्या मासिकाचे प्रकाशन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेता संदीप कुलकर्णी, उद्योजक वसंत मेस्त्री, उद्योजक अनंत भालेकर, उद्योजक अशोकराव दुघाडे आणि ‘कोस्टल कोकण’ मासिकाचे संस्थापक प्रदीप मांजरेकर, सह संस्थापक रचना लचके – बागवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
कोकण महाराष्ट्राचा मुकुटमणी
याप्रसंगी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, कोस्टल कोकण नावाचे मासिक इंग्रजीत काढल्याने खऱ्या अर्थाने कोकणाची ओळख जगाला होईल, कोकणाची माहिती इंग्रजीत का मिळत नाही, अशी खंत तरुणांमध्ये होती, आता परदेशात नोकरीनिमित्ताने गेलेल्या कोकणातील उद्योजकांना आपल्या कोकणात काय सुरु आहे, याची माहिती या मासिकाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे सांगत ज्या गोष्टी गोव्यात नाहीत, त्या गोष्टी सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आहेत. कोकणाची माहिती इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवली पाहिजे, या ठिकाणी चित्रपटांची शूटिंग झाली पाहिजे, असेही राणे म्हणाले. तर अभिनेता संदीप कुलकर्णी म्हणाले, कोस्टल कोकण मासिक इंग्रजीत काढले हे योग्यच आहे. महाराष्ट्राचे ५ वेगळे विभाग आहेत, त्यांचा कोकण मुकुटमणी आहे. कारण कोकणात सगळेच आहे, त्यांचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो, अशा वेळी कोकणाची माहिती परदेशातील पर्यटकांना झाली पाहिजे, यासाठी हे मासिक दुवा ठरेल, असे म्हणाले. तर कोस्टल कोकणचे संस्थापक प्रदीप मांजरेकर यांनी कोकणचा विस्तार मोठा आहे, त्यामध्ये बरीच पर्यटनाची ठिकाणे आहेत. त्यात बीच, किल्ले आहेत, त्यांची नावे मात्र गुगलमध्ये चुकीचे आहेत, त्यात आम्ही दुरुस्त्या केल्या आहेत. हे मासिक आम्ही मुद्दाम इंग्रजी आणत आहोत, कारण ग्लोबल भाषा आणि उद्योगाची भाषाही इंग्रजी आहे, त्यामुळे आम्ही या भाषेत कोकण जगाला सांगणार आहोत. रचना लचके-बागवे म्हणाल्या की, या मासिकाच्या माध्यमातून आम्ही ट्रॅव्हल आणि टुरिझम, खाद्यसंस्कृती आणि व्यापार या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत.
या उद्योजकांना मिळाला कोकण गौरव पुरस्कार!
- इशा टूर्सचे आत्माराम परब
- कोकण महाराजा रिसॉर्टचे मुकुंद कोळंबकर
- रॅंकोज बंगलो प्रकल्पाचे सुधीर राणे
- कोकण कट्टा हॉटेलचे प्रियंका गांधी, प्रमोद गांधी
- सुविद्य इन्स्टिट्यूट अँड टेक्नॉलॉजीचे वसंत मेस्त्री
- सोहम हॉलिडेज टूर्स कंपनीचे सुधाकर बाबर
- अभिनेता संदीप कुलकर्णी
- उद्योजक किरण खोत
- कातळ शिल्पचे सुधीर रिझबुड