मुंबई महापालिकेचा महत्वाचा प्रकल्प असलेला मुंबई सागरी किनारा(कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम सध्या ३४ टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रातून जाणाऱ्या पुलाच्या बांधकामामध्ये एकस्तंभी पाया(मोनो फाऊंडेशन)चा वापर केला जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या माध्यमातून या मोनो फाऊंडेशनचा वापर भारतात प्रथमच होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्याकडून काढून मेट्रो वूमन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवल्यापासून, या प्रकल्पाला गती मिळाली आहे. मेट्रो रेल्वेचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाला आता ज्याप्रकारे गती दिली आहे, ते पाहता हा प्रकल्प २०२३च्या अखेरीस किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा आहे कोस्टल रोड
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची लांबी १०.५८ कि.मी असून, त्यामध्ये ३ आंतरबदल(Diversions) व ४ वाहनतळांचा समावेश आहे. आंतरबदलांची लांबी १५.६६ कि.मी एवढी आहे. या प्रकल्पांतर्गत २ कि.मी लांबीचे २ बोगदे हे १२.२० मीटर व्यासाचे असल्याने ते अजस्त्र टनेल बोरिंग मशिनने तयार होणार आहेत. या प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्याा पादचारी मार्गाची लांबी ८.५ कि.मी एवढी आहे. तसेच समुद्र भिंतीची लांबी ७.४७ कि.मी एवढी असून, त्याचे काम ६८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
(हेही वाचाः 176 खांबांवर कोस्टल रोडच्या पुलाचा भार!)
मोनो फाऊंडेशन तंत्रज्ञानाचा वापर
या प्रकल्पामध्ये भुयारी मार्ग, रस्ते आणि समुद्रात पूल बांधून बांधकाम केले जाणार आहे. त्यातील समुद्रात पूल बांधण्यासाठी आजवर भारतात कुठेही वापर न झालेला एक स्तंभी पाया असलेल्या, मोनो फाऊंडेशन तंत्राचा वापर केला जाणार आहे. ज्यामध्ये केवळ एकच पिलर येतो. युरोपमध्ये या तंत्राचा वापर केला होता. महापालिकेने निविदेमध्ये याचा अंतर्भाव केला होता. त्यानंतर आयआयटीच्या टिमने तिथे जाऊन याचा अभ्यास केल्यानंतर, या तंत्राचा वापर समुद्रातील पुलांच्या बांधकामांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतात प्रथमच हे तंत्र वापरुन कोस्टल रोड प्रकल्प साकारला जाणार आहे. या तंत्राचा वापर केल्यामुळे वेळ, तसेच पैशांचीही बचत होईल, असा विश्वास अतिरक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, जमिनीवरील बांधकामांमध्ये ग्रुप पाईल्सचाच वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मावळाने सर केले ५०० मीटरचे अंतर
सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत(मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरण्यात येणार असून, या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मावळ्याने आतापर्यंत ५०० मीटरचे अंतर सर केले आहे. जर एकूण टक्केवारी सांगायची झाल्यास या बोगद्याचे काम ११ टक्के पूर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त पाईल्स, पुलांचे स्तंभ, पुलांसाठी लागणारे गर्डर, बोगद्यामधील प्रवेशासाठी असणारे उतार, आर.सी.सी. बॉक्स इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे या सर्व कामांची गती पाहता हा प्रकल्प २०२३च्या अखेरीस किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः कोस्टलच्या भुयारी मार्गात ‘मावळा’ लढतोय… जोरात मार्गक्रमण सुरू)
मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची माहिती
कोस्टल रोडचे पूर्ण झालेले काम : ३६ टक्के पूर्ण
काम पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी : जानेवारी २०२४
भरावाचे पूर्ण झालेले काम : ९० टक्के
समुद्र भिंतींचे पूर्ण झालेले काम : ६८ टक्के
बोगदा खणण्याचे पूर्ण झालेले काम : ११ टक्के म्हणजे ५०० मीटर
Join Our WhatsApp Community