छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (Coastal Road) मंगळवारपासून वाहनांसाठी खुला झाल्यानंतर मुंबईकरांनी वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत पहिला प्रवास केला. यामुळे वर्षानुवर्षे विल्सन कॉलेज गिरगाव चौपाटी ते प्रिन्सेस पुलापर्यंत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना कोस्टल रोडवरून प्रवास केल्यानंतर जो अनुभव आला त्यावरून या मार्गावरील सकाळी होणारी ४० टक्के वाहतूक कोंडी सुटली असल्याचे समोर आले आहे.
वरळीतील बिंदू माधव चौकातून वाहतूक वळवली
कोस्टल रोड (Coastal Road) चे सोमवारी, ११ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हा मार्ग मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी पश्चिम उपनगरांतून येणारी वाहने वाहतूक पोलिसांनी वरळी येथील बिंदू माधव चौकातून कोस्टल रोड मार्गे वळवली. त्यामुळे पूनम चेंबर, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजीअली, महालक्ष्मी मंदिर, पेडर रोड, विल्सन कॉलेज, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड ते मरीन लाईन्स, प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंतच्या नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत सुमारे ३० ते ४० टक्के घट झाल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटली?
अंधेरी, बोरीवली, वांद्रे आदी भागातून राजीव गांधी सी-लिंक रोडने आल्यानंतर पुढे वरळीपासून दक्षिण मुंबईत येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यात सर्वाधिक वाहतूक कोंडी वरळी नाका, पूनम चेंबर, हाजी अली, पेडर रोड व गिरगाव चौपाटीदरम्यान होत असे. त्यामुळे वरळी ते प्रिन्सेस स्ट्रीट पुलापर्यंत येण्यासाठी किमान ४० ते ५० मिनिटे लागत होती. अनेकदा हा प्रवास तासाभराचा होत असे. मात्र कोस्टल रोडने (Coastal Road) मंगळवारी अवघ्या १० ते १५ मिनिटांत प्रवास झाल्याचा अनुभव प्रवाशांचा आहे.
Join Our WhatsApp Community