मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत पुढील टप्प्यात दहिसर – मिरा भाइंदरची कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकूण ३२ किलोमीटरचा सागरी किनारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पालाही या किनारी मार्गाची जोड दिल्याने वांद्र्यातून थेट रायगडला जाण्याचा पर्याय मिळणार आहे. परिणामी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होवून जलद गतीने प्रवासाचा अनुभव येणार असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा भाग असलेल्या भूमिगत बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नेपीयन सी रस्ता परिसरात प्रियदर्शनी पार्क येथे ३० मे २०२३ दुपारी हा छोटेखानी सोहळा पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता) एम. स्वामी, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) विजय निगोट, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह या प्रकल्पाशी संबंधित विविध अधिकारी, कामगार आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून ‘ब्रेक-थ्रू’ करण्यात आला. ब्रेक-थ्रू होताच याठिकाणी उपस्थित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी एकच जल्लोष केला. मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा, असा हा मुंबई किनारा रस्ता (मुंबई कोस्टल रोड) महत्वाकांक्षी प्रकल्प असून अनेक अडथळ्यांवर मात करत तो पूर्णत्वास येत आहे. किनारी रस्त्याला मुंबई पारबंदर प्रकल्पापर्यंत भविष्यात जोड दिली जाईल आणि इतर विविध रस्त्यांनाही हा प्रकल्प जोडला जाईल, त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक सुलभ व सुखकर होईल, असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा Devendra Fadanvis : तीन ते चार लोकांमुळे ठाकरे गट असंतुष्ट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत पुढील टप्प्यात दहिसर- मिरा भाइंदरची कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकूण ३२ किलोमीटरचा सागरी किनारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पालाही या किनारी मार्गाची जोड दिल्याने वांद्र्यातून थेट रायगडला जाण्याचा पर्याय मिळणार आहे. परिणामी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होवून जलद गतीने प्रवासाचा अनुभव येणार आहे. अतिशय आव्हानात्मक अशा प्रकल्पामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टीमने महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
‘मावळा’ने अवघ्या १५ मिनिटांत केला एक मीटर अंतराचा ‘ब्रेक-थ्रू’
मुंबई किनारी रस्ता निर्मितीसाठी ‘मावळा’ हे बोगदा खनन संयंत्र वापरले आहे. सुमारे १२ मीटर व्यासाच्या ‘मावळा’ने आज अवघ्या १५ मिनिटांत ‘ब्रेक-थ्रू’ करत खनन पूर्ण केले. बोगद्यातून ‘मावळा’ बाहेर येताच उपस्थित मान्यवरांसह अभियंता, अधिकारी आणि सर्व बांधकाम कामगारांनी एकच जल्लोष केला. हाती तिरंगा घेत त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ चा जयघोषही केला.
टीबीएमने मावळ्यांप्रमाणेच गड सर केला- उपमुख्यमंत्री
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत ‘मावळा’ या बोगदा खनन संयंत्र अर्थात टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) मावळ्यासारखी कामगिरी करत डोंगर भेदून गड सर केला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्रेक-थ्रू’ च्या कार्याचे कौतुक केले. देशातील सर्वात मोठ्या व्यासाचा जुळा बोगदा या टीबीएमच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टीमने तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्वच कंत्राटदारांनी आणि कामगारांनी अतिशय वेगाने या बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी कामगिरी बजावली असल्याचे कौतुक त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community