राज्यात थंडी वाढली; ‘या’ भागात किमान तापमान ६.८ अंशावर

उत्तरेत थंडीचा जोर वाढत असताना राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान आता कमी होऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमी होणा-या तापमानाचा प्रभाव रविवारी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जाणवला. विदर्भात रविवारी थंडीची लाट होती. रविवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. सोमवारीही विदर्भात थंडी कायम राहील, असा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे.

देशातील उत्तरेकडील भागांत अतितीव्र थंडीची लाट पसरली आहे. राजस्थान, हरयाणा, चंडीगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशांत १० जानेवारीपर्यंत थंडीच्या लाटेचा तडाखा दिसून येईल, असा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणासह विदर्भात अजून दोन दिवस राहील. संपूर्ण विदर्भात सध्या किमान तापमान अकरा अंशाच्याही खाली घसरले आहे. विदर्भाखालोखाल मध्य महाराष्ट्रात तापमान कमी नोंदवले गेले. त्यातुलनेत कोकणात अद्याप किमान तापमानात फारशी घसरण झालेली नाही. कोकणात थंडीचा जोर वाढण्यास अजून वेळ लागेल, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांकडून दिली गेली.

विदर्भातील रविवारी नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)

 • बुलडाणा – ११.५
 • अकोला – ११
 • यवतमाळ – १०.७
 • अमरावती – १०
 • चंद्रपूर – १०.२
 • वर्धा, गडचिरोली – ९.४
 • ब्रह्मपुरी – ९.६
 • नागपूर – ८
 • गोंदिया ६.८

राज्यातील इतर भागात दहा अंशाच्याखाली पोहोचलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)

 • उस्मानाबाद – १०.१
 • औरंगाबाद – ९.४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here