‘बिसलेरी ट्रस्ट’अंतर्गत ‘बॉटल्स फॉर चेंज’ या उपक्रमान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (एमसीजीएम) ‘जी-उत्तर वॉर्ड’च्या भागीदारीतून गृहनिर्माण सोसायट्या, चौक्या, कॉर्पोरेट कंपन्या आणि चित्रपटगृहे या ठिकाणी प्लास्टिक संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. भारतातील प्लास्टिकचे प्रदूषण संपविण्याकरीता चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘बॉटल्स फॉर चेंज’ ही संकल्पना मांडून ‘बिसलेरी ट्रस्ट’ कार्य करीत आहे. प्लास्टिकला कचरा न मानण्याबाबत जनजागृती करणे हा या संकल्पनेचा मूळ उद्देश आहे. प्लास्टिकचा वापर केल्यानंतरही त्याला कचऱ्याचे स्वरूप येत नाही, तर ते पुनर्वापर करण्याजोगे एक स्त्रोत ठरते. ‘कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी प्लास्टिक वेगळे ठेवा, स्वच्छ करा आणि थेट रिसायकलिंगसाठी थेट तुमच्या दारातूनच पाठवा’, असे आवाहन या मोहिमेतून करण्यात येते.
वापरलेले 650 किलो प्लास्टिक पुनर्वापरासाठी गोळा
चार दिवसांच्या या उपक्रमात ‘बॉटल्स फॉर चेंज’ने प्लास्टिक संकलन मोहिमेसाठी ‘जी उत्तर’ वॉर्ड आणि संगम प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून, वापरलेले 650 किलो स्वच्छ आणि कोरडे प्लास्टिक पुनर्वापरासाठी यशस्वीरित्या गोळा केले. हे पथक परिसरातील 50 ते 60 सोसायट्या आणि 500-600 व्यक्तींपर्यंत पोहोचले, त्याने एकत्रितपणे 16 जागरुकता सत्रे आयोजित केली. यावेळी 52 टक्क्यांपेक्षा जास्त भागधारकांनी ‘बॉटल्स फॉर चेंज मोबाईल अॅप्लिकेशन’ घेऊन त्यामध्ये नोंदणी केली. ‘बॉटल्स फॉर चेंज’ या मॉडेलची कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून देण्याकरीता ‘जी उत्तर’ वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांसाठी एक सादरीकरण करण्यात आले. या मोहिमेत महापालिकेचे कनिष्ठ अधिकारी, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, फील्ड मार्शल, मुकादम, मजूर असे अनेकजण सहभागी झाले होते.
(हेही वाचा – बेरोजगारीची मोठी समस्या! भारतातील ‘इतके’कोटी तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत)
कशी होते प्लास्टिकवर प्रक्रिया
हे मॉडेल अंमलात आणण्यास सोपे आहे. प्लास्टिकची वस्तू वापरल्यानंतर ती स्वच्छ करणे, पिशवीमध्ये ती वेगळी ठेवणे आणि स्वच्छ प्लास्टिकच्या या पिशव्या आपल्या दारात येणाऱ्या कचरावेचकाकडे देणे एवढेच काम नागरिकांना करायचे आहे. हे कचरावेचक नंतर ‘बॉटल्स फॉर चेंज व्हॅन’शी संबंधित ‘ग्रीन एजंट’ किंवा स्वयंसेवी संस्था यांच्याशी संपर्क साधतील आणि गोळा झालेल्या पिशव्या भंगार व्यावसायिकाला विकण्याकरीता त्यांच्या स्वाधीन करतील. भंगार व्यावसायिकाने हे स्वच्छ प्लास्टिक रिसायकलरला विकायचे आहे. अशा प्रकारे ही साखळी पूर्ण होते. प्लास्टिकचे विविध प्रकार असतात. त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर उपयुक्त उत्पादने बनवण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करताना, ‘एमएलपी (मल्टीलेअर प्लास्टिक) रॅपर्स’चे रुपांतर ‘एमएलपी शीट्स’मध्ये करण्यात येते. त्या शीट्सपासून पुढे मोटारींचे सुटे भाग, कचरा साठविण्याचे डबे, बाकडी, बॅगपॅक आणि इतर अनेक वस्तू बनविण्यात येतात. यातील ‘एचडीपी’ (हाय–डेफिनिशन प्लास्टिक) प्रकारच्या प्लास्टिकचे रुपांतर पेव्हर ब्लॉक्स व ग्रॅन्युल्समध्ये केले जाते व त्यातून अनेक उपयुक्त उत्पादने घेतली जातात. ‘पेट बॉटल्स’ क्रश करून त्यातून ‘फायबर फ्लेक्स’ तयार केले जातात आणि त्यापासून टी-शर्ट्स, बॅग्ज, आऊटडोअर फर्निचर व इतर अनेक वस्तू बनविल्या जातात. अशा प्रकारे, वर्तुळाकार अर्थव्यवस्थेची साखळी तयार होते. हे मॉडेल या साखळीचा भाग असलेल्या प्रत्येक भागधारकासाठी मूल्य निर्माण करते.
60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर
या उपक्रमाविषयी बोलताना, ‘बॉटल्स फॉर चेंज’ या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ विभागाच्या संचालिका अंजना घोष म्हणाल्या, “भारतात जितके प्लास्टिक निर्माण होते, त्याच्या 60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर विद्यमान यंत्रणेतून करण्यात येतो. कचरापेटीत टाकलेले प्लास्टिक डंपयार्डपर्यंत जाते. तिथे वजनाला जड असलेले प्लास्टिक कचरावेचक गोळा करतात आणि ते स्वच्छ करतात. हे प्लास्टिक ते भंगार व्यावसायिकाला विकतात आणि ते भंगार व्यावसायिक प्लास्टिक रीसायकलर्सना विकतात. उर्वरित 40 टक्के प्लास्टिक ‘डंपयार्ड’मध्ये किंवा ‘लँडफिल्स’मध्ये पडून राहते, कारण ते स्वच्छ नसते आणि त्यामुळे ते पुनर्वापरासाठी पाठवले जाऊ शकत नाही. प्लास्टिकची वस्तू वापरून झाल्यावर ती फेकून देण्याअगोदर स्वच्छ व विलग न करण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकचे मोठे प्रदूषण होत आहे. हे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात होते. आमच्या उपक्रमातून आम्ही सातत्याने नागरिकांना प्लास्टिकची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रबोधन करीत आहोत. नागरिकांनी आपल्या सवयीत बदल घडविले, तर प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल. ‘जी उत्तर’ वॉर्डातील नागरिक, कॉर्पोरेट्स, शाळा आणि महाविद्यालये यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाने मी आणि माझे संपूर्ण पथक भारावून गेलो आहोत. या मोहिमेत आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सरकारी अधिकाऱ्यांचेही आभारी आहोत.”
‘जी उत्तर’ वॉर्डचे घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता काझी इरफान म्हणाले, “बॉटल्स फॉर चेंज” हा बिसलेरीने हाती घेतलेला पर्यावरणाच्या संरक्षणासाठीचा एक उत्तम अभिनव प्रयोग आहे. जनजागृतीमुळे या चळवळीला अल्पावधीतच गती मिळेल आणि सर्व घरांतील लोक या चळवळीत सहभागी होतील अशी आशा आहे.”
Join Our WhatsApp Community