थेट महाविद्यालयालाच उच्च न्यायालयाने ठोठावला दंड

खंडपीठाने महाविद्यालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नावाचा घोळ झाल्याने एका विद्यार्थ्याचं प्रगतीपत्रक दुस-या विद्यार्थ्याला गेल्याचं किंवा नाव अथवा आडनावावरुन महाविद्यालयाकडून घोळ झाल्याच्या ब-याच घटना घडतात. आता तर एका महाविद्यालयाकडून विद्यार्थिनीला चक्क एका विषयाचे गुण दुस-याच विषयाला देण्यात आले आहेत.

गणिताचा पेपर देणा-या विद्यार्थिनीला जीवशास्त्राचे गुण देण्याचा गलथानपणा करणा-या महाविद्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच गुणपत्रिकेत झालेला घोळ दुरुस्त करण्याचे आदेश न्यायालयाने शिक्षण मंडळाला दिले आहेत.

(हेही वाचाः कोरोनाच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढणार?)

विद्यार्थीनीने केली न्यायालयात तक्रार

नाशिक येथील विद्यार्थिनी स्नेहल देशमुखने बारावीच्या परीक्षेत गणित विषय घेतला होता. तिला पुढे अभियांत्रिकीचे  शिक्षण घ्यायचे होते. मात्र तिच्या गुणपत्रिकेत तिला गणिताऐवजी जीवशास्त्र या विषयाचे गुण देण्यात आले. त्यामुळे तिला अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेता आला नाही. याबाबत तिने महाविद्यालयात आणि शिक्षण मंडळाकडे वेळोवेळी अर्ज करुन, चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र या अर्जाकडे कानाडोळा करण्यात आला. म्हणून तिने मुंबई उच्च न्यायालयात शिक्षण मंडळ आणि महाविद्यालयाविरोधात याचिका दाखल केली.

काय म्हणाले न्यायालय

न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. महाविद्यालयाने पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे विषयांचा गोंधळ झाल्याचं स्नेहलने सांगितलं. महाविद्यालयाने ही चूक मान्य करत, दुरुस्त करण्याची हमी दिली. पण मंडळाने यावर हरकत घेतली आणि आपल्या संगणक प्रणालीमध्ये महाविद्यालयाकडून आलेला तपशील एकदा अपलोड केल्यावर पुन्हा बदलता येत नसल्याचं सांगितलं. मंडळाच्या अशा वक्तव्यावर न्यायलयाने नाराजी व्यक्त केली. खंडपीठाने महाविद्यालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत विद्यार्थिनीला या प्रकारामुळे मनस्ताप झाल्याने या दंडाची रक्कम तिला देण्यात यावी, असं खंडपीठाने सांगितलं आहे. सोबतच मंडळाने झालेला हा घोळ दुरुस्त करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिला आहे.

(हेही वाचाः मुंबईतील क्षय रुग्णांवर नवीन उपचार पद्धतीचा वापर!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here