कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु होते. पण, सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. आता शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही सुरु करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठवला आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
ऑफलाईन वर्ग सुरु व्हावेत
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यातील अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालये ऑफलाईन पद्धताने सुरु करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे, उदय सामंत यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: शाळा सुरू करण्यापूर्वी मंत्री वर्षा गायकवाडांनी काय केल्या सूचना? वाचा…)
आढावा बैठक घेण्यात आली
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यात कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने, महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर, महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community