सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालये, कृषी विद्यापीठे कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करुन विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन, नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील, असे आदेशात नमूद केलेले आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांचे पाणी विजेने पळवले… पुढील काही दिवस पाणी कपातीचे! )
या आदेशातील अटी व शर्ती
1) जिल्ह्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांनी कोविड-१९ संबंधित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. संबंधित महाविद्यालयाकडे पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था व इतर उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध असल्यास महाविद्यालयांनी ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबत त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. सदर निर्णय घेण्यासाठी महाविद्यालयांना मुभा राहील.
2) ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी असेल. लसीकरण (दोन्ही डोस ) न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
3) परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांच्या सूचनेनुसार किंवा महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
4) परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना, प्रश्नसंच, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी.
5) महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
6) वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी विचारविनिमय करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
7) ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्थानिक प्रशासन, आरोग्य विभागाशी समन्वय साधून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.
8) जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे, विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
या सर्व अटी व शर्थींचे पालन न केल्यास संबंधित कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह, भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community