गेल्या वर्षी कोरोनापासून बंद असलेली महाविद्यालये आता पुन्हा एकदा सुरु होणार असून, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तशी माहिती दिली. यंदाचे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु होतील, असे उदय सामंत म्हणाले.
विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली आहे. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असे उदय सामंत म्हणाले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल, असे देखील ते म्हणाले.
(हेही वाचा : कुलाबा-सीप्झ मेट्रोची आरेतील ‘त्या’ जागेवर एन्ट्री होणार नाहीच!)
म्हणून दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू!
1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्याने कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार सुरु आहे, असे उदय सामंत म्हणाले. दरम्यान महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही, हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असेही सामंत म्हणाले. तसेच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेदेखील ते म्हणाले. कोरोनाच्या काळात मागील दीड-पावणे दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या. ऑनलाईन लेक्चर सुरु आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालला आहे, त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरु करण्याचा विचार सुरु झाला आहे.
Join Our WhatsApp Community