गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन राज्यपाल कोश्यारी यांनी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या या मंगलप्रसंगी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, राज्यनिर्मितीच्या आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर विभूतींचे आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी
ते म्हणाले की, कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. २२ एप्रिलपर्यंत सुमारे १ कोटी ३७ लाख लोकांचे लसीकरण करुन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरुन केंद्र शासनामार्फत हाफकिन संस्थेस नुकतीच लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादीत होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी १०० टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. अतिरिक्त प्राणवायुची उपलब्धता करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
(हेही वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!)
गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी
ते म्हणाले की, शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज
शेतकरी थकबाकीदार होऊ नये यासाठी ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ पासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत राज्यातील पशुपालकांच्या दारी पशुवैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी शासनाने प्रथम टप्प्यात ७१ तालुक्यांमध्ये ७१ फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करुन त्याचे लोकार्पण केले आहे.
मराठीसाठी यशस्वी प्रयत्न!
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी भाषा भवनचे उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वविख्यात पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीचा वारसा जपण्याच्या दृष्टीने गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालन उभारणीचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
(हेही वाचा : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाला ११ वर्षे पूर्ण, तरीही एमटीडीसीच्या यादीत स्थान नाही!)
कोस्टल रोड, सागरी सेतू, मेट्रो लाइन्सची कामे गतीने सुरु
नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नामकरण व लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका, नगरपरिषद यांचा समावेश करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता ठाणे मुख्यालय असलेले एकच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता) लागू करण्याबाबतची अभ्यासगटाची शिफारस मान्य करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. मुंबई किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु असून वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरु झाले आहे. मुंबईतील १४ मेट्रो लाइन्सचे ३३७ किलोमीटर लांबीचे काम प्रगतिपथावर आहे. सर्व १४ मेट्रो लाइन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत. नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत महाराष्ट्राने सातत्य राखले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या १२ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कार राज्याने पटकावले आहेत ही भूषणावह बाब आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी काढले.
राजभवन येथे ध्वजारोहण
दरम्यान, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे ध्वजारोहण केले. राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Join Our WhatsApp Community