स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाची सुरुवात

130

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ जुलै २०२२ रोजी आषाढ गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा आरंभ दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आला. दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत हे वर्ग घेण्यात येणार आहेत.

सुरुवातीला मोडी लिपीच्या वर्गाबद्दल आणि प्रशिक्षणासंबंधात तसेच मोडी लिपीच्या महत्त्वाबाबत सुनील कदम यांनी माहिती दिली. इतिहास संशोधकांसाठी ही मोडी लिपी महत्त्वाची आहे, ते उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रतीक पाटणकर यांनी पावनखिंडीच्या रणसंग्रामाबाबत महत्त्वपूर्ण आणि अंगावर काटा आणणारी माहिती आपल्या व्याख्यानात सादर केली.

विजेत्यांचा गौरव

या कार्यक्रमाच्यावेळी अलीकडेच आयोजित केलेल्या मोडी लिपीच्या दोन स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये शीघ्र मोडी लिपी लिप्यंतर स्पर्धा २०२२ मधील प्रथम क्रमांक रिद्धि रवींद्र गुरव, व्दितीय क्रमांक प्रकाश शिवाजी डुंबरे आणि तृतीय क्रमांक अनिल सीताराम धुरी यांना देण्यात आला. तसेच सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा २०२२ मधील प्रथम क्रमांक रिद्धि रवींद्र गुरव, द्वितीय क्रमांक सचिन श्रीकांत भागवत, तृतीय क्रमांक राहुल शिरिष गोगटे यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, श्री.शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार, श्री.शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रतीक पाटणकर प्रमुख वक्ते म्हणून यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. श्री. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दुर्ग अभ्यासक गुरुवर्य अप्पा परब, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.