बाप्पाच्या दर्शनाला जाणारा चाकरमानी प्रशासनाच्या ‘या’ नियमांमुळे बेजार

चाकरमानी दोन महिने आधीच तिकीट काढतो, त्यावेळी का मग नियमावली जाहीर करत नाहीत?

146

बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले असताना कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दोन महिने आधीपासूनच चाकरमान्यांनी गावाला जायची सुरू केलेली असताना, आता जिल्हा प्रशासनाने घातलेल्या नियमांमुळे चाकरमान्यांची पुरती धावपळ उडाली आहे.  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत. चाकरमानी दोन महिने आधीच तिकीट काढतो त्यावेळी का मग नियमावली जाहीर करत नाहीत, असा संतप्त सवाल चाकरमानी उपस्थित करू लागले आहेत.

काय आहे नियम?

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्यांना कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तींची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीमध्ये ज्या व्यक्ती कोरोनाबाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी RTPCR चाचणी केलेली असल्याचे प्रमाणपत्रक बंधनकारक असणार आहे.

(हेही वाचाः विनामास्क फिरणा-यांवरची कारवाई पुन्हा कडक!)

लवकरच तोडगा निघणार

लसीकरण कमी असल्याने दोन डोस घेतलेल्यांना कोकणात प्रवेश किंवा कोरोना चाचणी बंधनकारक करणे सध्यातरी शक्य नाही. परंतु याबाबत दोन ते तीन दिवसांत तोडगा काढला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. कोरोनाची लक्षणे वगैरे असतील, तर चाचणी करणे योग्य आहे. दोन डोस घेतलेल्यांचे प्रमाणही कमीच आहे, त्यामुळे शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

नियम फक्त सर्वसामान्यांना

या सर्व प्रकरावरुन सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून, फक्त नियम, अटी सर्वसामान्य नागरिकांनाच असतात. राजकीय नेत्यांना सर्व माफ असते. आज राज्यभर आंदोलनं, राजकीय कार्यक्रम सुरू आहेत त्यावेळी कोरोना कुठे जातो? असा सवाल आता चाकरमानी करू लागले आहेत.

(हेही वाचाः …तर मंदिरांची कुलुपे तोडून देवाला भेटू! चंद्रकांत पाटलांचा इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.