वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आरोग्यसेविकांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार केला आहे. परिणामी, गेल्या आठवड्याभरापासून बेमुदत संपावर गेलेल्या चार हजार आरोग्यसेविका सोमवारी संप मागे घेण्याची दाट शक्यता आहे.
दोन हजार रुपये पगारवाढ
पावसाळी आजार नियंत्रणात ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणा-या आरोग्यसेविकांना दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेकडून प्रशिक्षण दिले जाते. मात्र अद्यापही यंदाच्या वर्षाची तारीख ठरलेली नाही. पगारवाढीसह, प्रसूती रजा तसेच इतर प्रलंबित मागण्यांवर आरोग्य सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. मात्र, कामाचा खेळखंडोबा लक्षात घेत किमान वेतनवाढ म्हणून दोन हजार रुपये पगारवाढ देत आता आरोग्यसेविकांना दर महिन्याला अकरा हजार शंभर रुपये मिळणार आहेत.
(हेही वाचाः पगारवाढ टप्याटप्प्याने? आरोग्यसेविकांच्या मागण्यांवर पालिकेचा प्रस्ताव)
टप्प्याटप्प्याने पगारवाढ
या मागणीसह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून पगारवाढीत हजार रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले. वाढत्या पगारात करकपात केली जाणार नाही. टप्प्याटप्प्याने पगारवाढ दिली जाईल. पालिका अधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर इतर मागण्यांवरही सकारात्मकता दर्शवण्यात आली. या मागण्यांच्या इतिवृत्तांवर स्वाक्षरी झाल्यानंतरच आरोग्य सेविका कामावर रुजू होतील, असे आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community