लस पुरवठा करणा-या ‘त्या’ कंपन्या ठरल्या अपात्र

छाननी नंतर यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकलेला नाही.

सर्व मुंबईकर नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी पुढे आलेल्या ९ संभाव्य पुरवठादार कंपन्या या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता, स्पुlनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधला असून, त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुlनिक लसींचा साठा महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या लसींचा साठा जूननंतरच देण्यात येईल, असेही कंपनीने कळवल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

महापालिकेचा पाठपुरावा

मुंबई महापालिकेला कोविड लसींचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर १२ मे २०२१ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. संभाव्य पुरवठादारांना कागदपत्रे पूर्तता करण्याचे निर्देश देऊन, सातत्याने चर्चाही केली. विशेषतः लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादित करत असलेल्या कंपन्या, या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक होते. जेणेकरुन दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे लस पुरवठा होईल, याची खात्री पटेल. त्यासोबत नेमक्या किती दिवसांत लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला केला जाईल, लसींचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन, महापालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करत होते.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेच्या डोक्यावर लस खरेदीची टांगती तलवार)

प्रायोगिक तत्त्वावर लसींचा पुरवठा

अंतिम मुदतीनंतर एकूण प्राप्त ९ संभाव्य पुरवठादारांनी सादर केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर कार्यवाही करुन छाननी केली. छाननी नंतर यातील एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकलेला नाही. असे असले तरी मुंबई महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करुन घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी. वेलरासू यांनी स्पुतनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. त्यानुसार, प्रायोगिक तत्वावर स्पुतनिक लसींचा काही प्रमाणात साठा मुंबई महापालिकेला जून २०२१ अखेरपर्यंत देण्याची तयारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दर्शविली आहे.

पुन्हा करणार चर्चा

स्पुतनिक लसींच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येईल. तसेच जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुतनिक लसींचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत देखील, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. या अनुषंगाने येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

(हेही वाचाः लसीकरण केंद्रांच्या राजकीय भांडवलाला आयुक्तांचा चाप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here