डोंबिवली MIDC स्फोटातील कंपनीचा मालक म्हणतो, लागलेली आग दैवी घटना

274

डोंबिवली स्थित एमआयडीसीतील (MIDC) अमुदान कंपनीत झालेला स्फोट हा मानवी चूक नव्हे तर अॅक्ट ऑफ गॉड (दैवी घटना) आहे, असा अजब दावा कंपनीच्या मालकांनी न्यायालयात केला आहे. त्यांच्या या दाव्यावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

डोंबिवली येथील MIDC मधील अमुदान कंपनीत 23 मे रोजी केमिकलचा स्फोट झाला होता. त्यात 12 जण ठार, तर अनेकजण जखमी झाले होते. या प्रकरणी कंपनीचे मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांनी हा स्फोट दैवी घटना असल्याचा युक्तिवाद केला. डोंबिवलीमध्ये झालेला स्फोट हा मानवी चुकीने झाला नाही. ही घटना अॅक्ट ऑफ गॉड अर्थात नैसर्गिक आहे. त्या दिवशी उष्णता जास्त असल्यामुळे केमिकलचा स्फोट झाला. या प्रकरणी आरोपीचा कुणालाही दुखापत करण्याचा हेतू नव्हता, असे ते म्हणाले.

(हेही वाचा Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी)

मेहता दाम्पत्याच्या पोलिस कोठडीत वाढ

मेहतांचे वकील सम्राट ठक्कर यांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचे अशिल मलय मेहता यांच्या पोलिस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली. मलय मेहता यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांचीही पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सम्राट ठक्कर यांनी यावेळी स्नेहा मेहता यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. कंपनीच्या सहसंचालक असणाऱ्या स्नेहा मेहता यांचा कंपनीशी कोणताही थेट संबंध नाही. त्यांची स्वाक्षरीही कंपनीत चालत नाही. त्यांची कॉमर्स पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना केमिकलचे कोणतेही ज्ञान नाही, असे ते म्हणाले. पण त्याचा न्यायालयावर परिणाम झाला नाही.

12 मृतांपैकी केवळ तिघांची ओळख पटली

तत्पूर्वी, सरकारी वकिलांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रिअॅक्टर नेमका कुठून आणला याचा शोध घेणे आदी अनेक बाबींसाठी पोलिसांना आरोपीच्या 7 दिवसांची कोठडी आश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर वकील सम्राट ठक्कर यांनी तीव्र हरकत नोंदवली. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मेहता दाम्पत्याच्या पोलिस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली. डोंबिवली स्फोटात तब्बल 12 जण ठार झालेत. त्यांच्यापैकी केवळ 3 जणांची आतापर्यंत ओळख पटली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.