मागील काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील तुळशी तलाव भरुन ओसंडून वाहू लागले असले तरी तलाव क्षेत्रात अद्यापही पावसाची हजेरी त्याप्रमाणात न लागल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत २२ जुलैपर्यंतच्या पाणी साठ्याच्या तुलनेत सध्याचा पाणी साठा फारच कमी असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन्ही वर्षी या तारखेपर्यंत मोडक सागर धरण ओसंडून भरुन वाहायचे, परंतु हे धरण अद्यापपर्यंत केवळ ७५ टक्के एवढेच भरले असून भातसा धरणाची पातळीही ४० टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. तानसा तलाव ८६ टक्के तर विहार तलाव ७५ टक्के भरले गेले आहे. त्यामुळे सर्व धरणांमधील एकूण पाणी साठा सरासरी ४७ टक्क्यांपर्यंत जमा झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईकरांची वर्षाची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता असते. त्यातुलनेत सध्या सर्व धरण आणि तलावांमध्ये ६ लाख ८८ हजार १८२ लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला. जो मागील वर्षी याच तारखेला म्हणजे २२ जुलै रोजी १२ लाख ६८ हजार ६५६ दशलक्ष लिटर्स आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे सन २०२१ मध्ये ७ लाख ७९ हजार ५६८ लिटर्स एवढा पाणी साठा जमा झाला होता.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण तथा तलावांपैंकी तुळशी तलाव हे मध्यरात्री ओसंडून भरुन वाहू लागले. तुळशी तलावातील पाण्याची क्षमता ही ८ हजार ४६ दशलक्ष लिटर एवढी असून या तलावातून मुंबईतील काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुळशी तलाव भरले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांमधील याच तारखेला जमा झालेल्या सर्व धरणांमधील पाणी साठ्याचा विचार करता यावर्षीचा पाणीसाठा हा कमी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ४७.५४ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे, तर मागील वर्षी हा साठा ८७.६५ टक्के एवढा होता आणि त्या आधी म्हणजे २०२१ मध्ये हा पाणी साठा ५३.८६ टक्के एवढा होता. त्यामुळे मुंबईसह राज्यात पाऊस झोडपून काढला असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढत नसल्याने मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांविषयी जनतेच्या मनात विश्वास – प्रवीण दरेकर)
२१ जुलै रोजीचा तलावांमधील पाणी साठा व पावसाची नोंद
अप्पर वैतरणा : पाणी साठा (१९. २३ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (६० मि.मी)
मोडक सागर : पाणी साठा (७५. १७ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (१३४ मि.मी)
तानसा : पाणी साठा (८६.६५ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (१०१मि.मी)
मध्य वैतरणा : पाणी साठा (५६.२३ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (३९ मि.मी)
भातसा : पाणी साठा (३९. ६१ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (९३ मि.मी)
विहार : पाणी साठा (७५. ८२ टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (१४६ मि.मी)
तुळशी : पाणी साठा (१०० टक्के), शुक्रवारी झालेला पाऊस (१६३ मि.मी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community