गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसान ग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करुन, नुकसानाचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी मंगळवारी मदतीची ही घोषणा केली आहे.
काय होती निसर्ग चक्रीवादळात मदत
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसान ग्रस्तांना ठाकरे सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. यापूर्वी ही मदत 95 हजार इतकी दिली जात होती. निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत तातडीने 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये मदतीची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे आता तौक्ते वादळ ग्रस्तांना सुद्धा आता मदत देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community