दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासोबकच आता गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहे. ज्याठिकाणी विसर्जन केले जाईल तेथील समुद्राची आणि परिसराची दररोज स्वच्छता करावी, प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी या अटी बीपीटीने घातल्या आहेत.
गेट वे परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जने केले जाते परंतु या परिसरात पाण्याची खोली जास्त नसल्यामुळे गणेशमूर्तीचे अवशेष वर येतात व यामुळे बोटींचा अपघात होण्याची शक्यता असते या ठिकाणी एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करू नये असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टने पालिकेला दिले होते. परंतु आता बीपीटीने जेट्टी क्रमांक २ वर विसर्जनाला परवानगी दिली आहे. याठिकाणी पाण्याची खोली दोन मीटर आहे.
बीपीटीच्या अटी काय आहेत?
- पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन करावे त्याकरता पालिकेने नियमावली तयार करणे
- विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, धातू, लाकडाच्या वस्तू, मूर्तीचे अवशेष यांची दैनंदिन साफसफाई करावी.
- जेट्टीचे नुकसान होणार नाही हे पहावे, नुकसान झाल्यास दुरूस्त करून द्यावे.
- विसर्जनाबाबत पालिकेने बोटींचे व्यवस्थापन करणाऱ्या लॉंच ऑपरेटर आणि बीपीटी प्राधिकरणाला आधी कल्पना द्यावी.